दुल्हन हम ले जायेंगेचे स्टीकर्स लावून आले, 390 कोटींचे घबाड घेऊन गेले

जालना : प्राप्तिकर विभागाने जालन्यातील स्टील उत्पादकांवर टाकलेल्या धाडीत तब्बल 390 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले. या छाप्याची कुणालाही खबरबात लागू नये यासासाठी अधिकाऱ्यांनी टोकाची गुप्तता बाळगली. यासाठी त्यांनी आपल्या वाहनांवर दुल्हन हम ले जायेंगेचे स्टीकर्स लावले. यामुळे जालनेकरांना आपल्या शहरात एवढी मोठी धाड पडत आहे याचा थांगपत्ताही लागला नाही.

चार स्टील कारखानदारांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं
जालन्यात प्राप्तीकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास १३ तास रोख रक्कम मोजत होते.

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.