पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र, चुडा न काढण्याचा खुपिरेच्या महिलेचा निर्णय

कुडित्रे (प्रतिनिधी) : बोलोली येथे डी.पी.दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून मृत झालेल्या खुपिरे (ता. करवीर) येथील राम बळवंत पाटील यांच्या पत्नीने विधवा प्रथेला झुगारून मंगळसूत्र, चुडा व सोभाग्याचं लेणं तसंच ठेवून विधवा प्रथेला प्रत्यक्ष रित्या मूठमाती देऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. प्रत्यक्ष अनुकरण करून राम यांच्या पत्नीने समाजात एक वेगळा पायंडा पाडला आहे. 

विजेच्या डी.पी.ची दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसून खुपिरे येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रामजी पाटील (महाराज) यांचे नातू राम पाटील या तरुण वायरमनचा मृत्यू झाला होता. ११ जुलै रोजी ही घटना घडली होती. परिसरात जोराचा पाऊस असून देखील राम हे डी. पी. वर चढून तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम करत होते. अचानक विजेचा धक्का बसल्याने त्यांचे दोन्ही हातपाय, पाठ भाजले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. 

स्वभावाने मनमिळाऊ व लोकांची कामे करण्याची आवड असल्याने सांगरुळ सह बारा वाड्यांच्या परिसरात ते वायरमन म्हणून लोकप्रिय होते. डी. पी. वर विजेचा धक्का बसून ते ४५ टक्के भाजले होते. त्यांच्या प्रकृतीसाठी व बरे व्हावे यासाठी बारा वाड्यातील लोकांनी स्वयंभू देवस्थान येथे अभिषेक घातला होता. पण नियतीने त्यांना सोडले नाही. अखेर नियतीने त्यांना हिरावून नेलेच.  त्यांचा मृत्यूनंतर आता त्यांच्या पत्नीने विधवा प्रथा झुगारून मंगळसूत्र, चुडा काढलेला नाही. समाजात विधवा प्रथा बंद करण्याचे प्रत्यक्ष अनुकरण करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांचा हा निर्णय जिल्ह्यात एक नवीन पायंडा पाडणारा ठरणार आहे.  समाजात विधवांना एक मानाने जगण्याचा अधिकार मिळवणारा हा निर्णय ठरणार आहे. 

जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेणारी खुपिरे ही जिल्ह्यातील तिसरी ग्रामपंचायत आहे. आता तर प्रत्यक्ष अनुकरण करून समाजापुढे आदर्श ठेवणारे खुपिरे हे पहिले गाव ठरणार आहे.

🤙 9921334545