कोल्हापूर जिल्हयातील शाळांना सुट्टी जाहीर करावी – खा.धनंजय महाडिक 

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे.  पाऊस आणि थंड हवामान यांचा विपरीत परिणाम होऊन शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार  धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्र दिले. कोल्हापूर जिल्हयात अतिवृष्टीमुळे  पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हयातील ६० बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाऊस आणि थंड हवा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूराच्या पाण्यातून वाट काढत, विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पूरस्थितीमुळे शालेय  विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोचू नये, यासाठी खबरदारी म्हणून आजपासून तीन दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत  जिल्हयातील सर्व शाळांना सुट्टी दयावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्याकडे केली आहे.