पाण्यासाठी बाबा जरगनगरात उद्या रास्ता रोको आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपुऱ्या व कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी, 12 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता बाबा जरगनगर जकात नाका येथे पाचगाव येथील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

  येथील शिवस्वरूप नगर, पोस्टल कॉलनी, शेवंती पार्क, सावित्री चेंबर्स, साई कॉलनी,आंबेडकर नगर , आण्णाभाऊ साठे नगर, हरी पार्क , द्वारका नगर, राधाकृष्ण कॉलनी सुरम्य नगरी (आपटे मळा), सहजीवन सोसायटी रघुनाथ देसाई नगर, गणेश नगर, आर.के.नगर मूळ व 6 नं सोसायटी परिसर आदी भागातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पाचगाव उपनगर येथील रहिवासी असून आम्हाला कोल्हापूर महापालिके मार्फत पाणी पुरवठा होत आहे. 
तरी मागील एप्रिल 2020 पासून आम्हा सर्वांना महिन्यातून कमाल फक्त पाच वेळाच पाणी येते तेही जास्तीत जास्त 300 ते 400 लिटर पाणीपुरवठा होतो.
या पूर्वी आमच्याकडे एक दिवस पाणीपुरवठा होत होता.आता महिन्यातून जास्तीत जास्त तब्बल पाच दिवसच पाणीपुरवठा होत आहे. सर्व कामधंदे सोडून पाणी समस्येला तोंड देण्यास आमचा वेळ जात आहे याबाबत आम्ही पाणीपुरवठा विभागांमधील सर्व स्टाफ मधील अगदी पाणी सोडणाऱ्या कर्मचारी पासून ते मुख्य जलअभियंता पर्यंत लेखी तक्रार व मेसेज करून, बैठका घेऊन,तसेच फोनवर तक्रार करून देखील त्यावर अद्यापही काहीही ठोस उपाय केला नसून या परिस्थितीमध्ये किंचितही बदल झालेला नाही उलट दिवसें दिवस आम्हा नागरिकांना विनाकारण अपुऱ्या, अनियमित  होणाऱ्या पाणी पुरवठामुळे पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यापूर्वी एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. तरी याची दखल घेतली जात नसून यावर ठोस उपाय करावा. तसेच या भागात खाजगी टॅंकरचे पाणी विकत घेऊन आम्हाला आर्थिक भुर्दंड सोबत मानसिक व शारीरिक त्रास देखील सहन करावा लागत आहे.
तसेच आम्ही सर्वजण या प्रकारामुळे आता मानसिक व शारीरीक पूर्णतः थकलो आहोत. तसेच या भागात जेष्ठ नागरीक लक्षणीय पणे वास्तव्यास आहेत या वयात पाण्यासाठी कुठे कुठे वण वण फिरायचं आणि तुटपुंजी निवृत्ती वेतनातील टँकरसाठी किती रुपये खर्च करायचे ??
तरी वेळोवेळी आम्ही सर्व स्तरावर तक्रारी, सर्वजनिक चर्चा, बैठका करूनही हा प्रश्न सुटत नसून आमची दखल कोणीच घेत नसल्यामुळे मंगळवारी दि. 12 जुलै 2022 रोजी बाबा जरग नगर जकात नाका जवळ सायंकाळी 4:30 पासून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.