धोकादायक इमारतीमधील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : शहरामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून पूराचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. निवडणूक कार्यालयात सकाळी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली.

डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, नदीच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढत होत असल्याने सर्व नियंत्रण अधिकारी व उप-शहर अभियंता यांनी ज्या ज्या भागात पाणी येते तेथे लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. ज्या इमारती धोकादायक आहेत परंतु मालक व कुळ वादामुळे कोर्टकेस सुरु आहे अशा इमारतींमधील नागरीकांना तातडीने स्थलांतरीत होण्याच्या सूचना दया. या ठिकाणी कोणतीही जीवितहाणी होणार नाही याची काळजी घ्या. धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत होऊन निवारा केंद्रात यावे. यासाठी आजच उप-शहर अभियंता यांनी निवारा केंद्रांची पाहणी करुन त्या ठिकाणी आवश्यक त्या साहित्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. कुंभारगल्ली व मुक्त सैनिक वसाहत येथील मोठया गणेश मुर्ती स्थलांतरीत कराव्या लागणार असतील तर आताच त्याचे नियोजन करा. नाल्यातील काढलेला गाळ नाल्या कडेला असल्यास तातडीने तो उठाव करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या. धोकादायक वृक्ष कटिंग करण्यासाठी वॉर्ड वाईज चार पथके नेमण्याच्या सूचना उद्यान अधिकारी यांना दिल्या. महापालिकेच्या सर्व बोटी  सज्ज ठेवा, रबरी बोटींमध्ये काही तांत्रीक बिघाड आहे का ते तपासा.  निवारा केंद्रासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवा. पारिख पुल येथे पुलाखाली पाणी साठू नये यासाठी या ठिकाणी मोटरपंप ठेवण्यात आली आहे. त्याठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. दैनंदिन पाण्याची लेव्हल पब्लीक अनाऊसमेंट सिस्टिमद्वारे नागरीकांना कळवा या सिस्टीमद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती करा. वॉर्ड ऑफिसने व अग्निशमन विभागाने आपली सर्व संत्रणा सज्ज ठेवून आपत्ती कक्ष २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना उप-शहर अभियंता व मुख्‍य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, संदिप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तानाजी कवाळे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, पर्यावरण अभियंता समिर व्राघांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, स्टेशन ऑफिसर मनिष रणभिसे उपस्थित होते.