बालिंगेतील पूरग्रस्तांची पुनर्वसनाची मागणी

बालिंगा : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी वसाहतीमधील पूरग्रस्त ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची मागणी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पूरग्रस्त बालिंगा गावचे कायमचे रहिवाशी आहोत. ग्रामपंचायतीने प्लॉट पाडून गरीब व गरजू लोकांना देण्यात आले आहेत. सर्व घरांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. भूमापन कार्यालयामार्फत मोजणी होऊन सनद देण्यात आली आहे. आमची वसाहत भोगावती नदीपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत.

सन २०१९ व सन २०२१ मध्ये आलेल्या महापुरात आम्हास देण्यात आलेल्या घरात पुराचे पाणी शिरून आमचे आर्थिक व मानसिक तसेच लोकांच्या आरोग्य यांचे नुकसान झाले आहे.या कालावधीमध्ये शासनाकडून देण्यात येणारे पूरग्रस्त अनुदान आम्हास देण्यात आले आहे. आम्हाला ग्रामपंचायतीने दिलेल्या क्षेत्रफळ व सनद प्रमाणे मालकी ताबा सहित घरांचे पुनर्वसन करावे.तसेच सन २०१९ पासून सलग दोन वर्षांपूर्वी कोरोना आजाराने थैमान घातले होते. महापूर व कोरोनामुळे गावातील लोकांना मदत करण्याची इच्छा असतानासुध्दा त्यांना मदत करता आली नाही. आमच्या वस्तीतील लोकांना गावामध्ये भाड्याने घर मिळाले नाही अथवा लोकांनी घरे सुध्दा देण्यास नकार दिला. तरी जेथे पुराचे पाणी येणार नाही, अशा ठिकाणी आम्हा सर्वांना जागा देऊन आमचे पुनर्वसन करावे असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती करवीरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी नंदकुमार गाडे, शिवाजी वाडकर, राजाराम कोरवी, शामराव कांबळे, शहाजी कांबळे, निलेश पाटील, गंगाराम कुराडे, अविनाश कोरवी, संग्राम कांबळे, युवराज जरंडे, चंद्रकांत कांबळे, युवराज बागडी,राम लोणारी, अमर कांबळे, संजय मेथे, शिवाजी कोरवी, नागेश कांबळे, प्रथमेश वाडकर आदी उपस्थित होते.