मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये कडवी झुंज सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीतील पक्ष अधिक सतर्क झालेले दिसून येत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे आज स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात ही निकराची लढत होत असून. भाई जगताप दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शीअल वोटींग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ४४ आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्यासाठी २६ मतं मिळू शकतील. मात्र भाई जगताप यांना जिंकण्यासाठी आठ मतं कमी पडतायत. या आठ मतांसाठी काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. यासाठी काँग्रेसने शिवसेनेकडे अतिरिक्त मतांची मागणी केल्याची माहिती आहे.
भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची शक्ती पणाला लागली आहे. प्रसाद लाड यांच्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शक्ती पणाला लावली आहे. विधान परिषदेच्या दाव्या जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.