कोल्हापूर : मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेची सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत महापलिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत सीबीएसई शाळा सुरु करण्याबाबतच्या निकषांची माहिती घेऊन २४ जूनपर्यंत यासंबंधित आराखडा सादर करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या. यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकांच्यावतीने सीबीएसई शाळा चालवल्या जातात. आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयंत आसगांवकर यांनी काही दिवसापूर्वी या शाळांना भेट दिली होती. तेथील शिक्षण पद्धतीची माहिती घेतल्यानंतर कोल्हापुरातील विद्यार्थ्यासाठी महापालिकेच्यावतीने अशा प्रकारची शाळा सुरु करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुशंगाने कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक घेण्यात आली. महपालिकेच्या शहर आणि उपनगरात अशा मिळून ५८ शाळा आहेत. त्यापैकी ४३ शाळा या मराठी असून १५ शाळा या सेमी इंग्रजी असल्याचे प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांनी यावेळी सांगितले.
सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढताना दिसत आहे. कोल्हापुरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सुध्दा सीबीएसई सारखा अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी महापलिकेच्यावतीने अशी शाळा सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी निकषांची माहिती घेऊन सविस्तर आरखडा तयार करून २४ जूनपर्यंत तो सादर करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या.
महापालिकेच्या सीबीएसई शाळेसाठी आपण पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी यावेळी दिली. महापालिका शाळेच्या इमारती चांगल्या आहेत. महापालिकेची सीबीएसई शाळा सुरु व्हावी यासाठी आवश्यक सर्व ती मदत करू. सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिकेच्या शाळांच्या इमारतीची पाहणी करणार असल्याचे आमदार ऋतुराज पाटील व आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी सांगितले.
या बैठकीला उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार, शैक्षणिक पर्यावेक्षक बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.