‘या’ पिकांचा विम्यात समाविष्ट करा : राजू शेट्टी

कोल्हापूर : आग व महापुरात नुकसान होणाऱ्या पिकांचा समावेश पीक विम्यामध्ये करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. भुसे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता यासंदर्भातील निवेदन त्यांना देण्यात आले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, गत दोन वर्षामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दरवर्षीच्या या अस्मानी संकटामुळे ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस व भाजीपाला उत्पादकांवर महापुराचे संकट हे दरवर्षी येऊ लागले आहे. दोन्ही जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊ लागलेली आहे. यामुळे ऊस व भाजीपाला उत्पादकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या महापुरामुळे शासनाकडून जी नुकसान भरपाई दिली जात आहे, ती अत्यंत अपुरी असून त्या मदतीतून शेतकरी मशागतदेखील करू शकत नाही. यामुळे सदरच्या नुकसान भरपाईतून सावरण्यासाठी शेतकरी पीक विमा उतरविण्यास तयार आहेत.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एकरी एक लाख व भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना एकरी पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई देऊन सदर विम्याचा हप्ता शेतकरी, पाटबंधारे विभाग व साखर कारखाने यांच्याकडून घेऊन राज्य सरकारच्या विमा कंपनीमार्फत पूरग्रस्त भागातील ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. तसेच आगीमध्ये जळालेल्या उसासही शेतकरी व महावितरण यांचेकडून पीक विमा हप्ता भरून घेऊन नुकसान भरपाई देणे शक्य आहे. मी या आधीही आपणांस व मुख्यमंत्री महोदयांना पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या पीक विम्याबाबत अवगत केले असून याबाबत शासन स्तरावरून लवकरात लवकर कार्यवाही करून पूरग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.