कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकाच्या उंबरठ्यावर उभी असणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन संस्था परिसरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचे अर्थात आधुनिक शास्त्र आयुर्वेद, होमिओपॅथी अशा सर्व विद्याशास्त्रांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेस २०२४ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने शाहू स्मारक भवन येथे 7 जून पासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे संयोजक सचिव डॉक्टर उद्धव पाटील, सदस्य डॉक्टर अमर आडके यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘बाल आरोग्य केंद्र’. आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव अशा कारणांमुळे बरीचशी लहान मुले उपचारांपासून वंचित राहतात.ही समाजाची गरज ओळखून अतिशय नाममात्र शुल्कात बाल रुग्णांसाठी तपासणी आणि उपचार गेली ६२ वर्षे संस्थेच्या वतीने सुरू आहेत. आता संस्थेच्या शताब्दी निमित्त कोल्हपूरातील तज्ञ डॉक्टर्स महिन्यातील विशिष्ठ दिवशी उपलब्ध होणार आहेत. त्यातून गरजूंना सदस्य डॉक्टरांच्या सहकार्याने आवश्यक त्या उपचारांसाठी विशेष योजना अमलात आणल्या जाणार आहेत, तज्ञांची समाजप्रबोधनात्मक व्याख्याने प्रत्येक माहिन्याच्या २४ तारखेला आयोजित केली जाणार आहेत, याची सुरुवात ७ जून रोजीच्या अवयवदान या विषयावर डॉक्टर अमोल कोडोलीकर व्याख्यानाने होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेला केएमएच्या अध्यक्षा डॉक्टर गीता पिल्लाई,डॉक्टर रविंद्र शिंदे,उपाध्यक्ष डॉक्टर किरण दोशी, डॉक्टर ए. बी.पाटील, डॉक्टर राजेंद्र वायचळ, डॉक्टर आबासाहेब शिर्के, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर रमाकांत दगडे उपस्थित होते.