‘या’ मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोल्हापूर : कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले. महामारीत केंद्र आणि राज्य सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कोरोना लसीकरण उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. तरीही काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविड-19 मुळे आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

  पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ, सेवा तसेच कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान मोदी यांनी आभासी पद्धतीने (ऑनलाईन) संवाद साधला.

कोल्हापूर जिल्ह्यात 14 बालके आई-वडीलांविना पोरकी झाली आहेत. आज संवादाच्या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सहायक लेखाधिकारी के. बी. खरमाटे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते,  बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, सदस्य ॲड. दिलशाद मुजावर, ॲड. संजय मुंगळे, बाल न्याय मंडळाचे ॲड. एस. पी. कुरणे, ॲङ रेवती देवाळपुरकर यांच्यासह बालके, त्यांचा सांभाळ करणारे पालक उपस्थित होते.

   पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मुलांनो तुमच्या आई-वडीलांचा मृत्यू भरून निघणार नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती मुलांच्या सोबत असेल. मनोरंजन, खेळाबरोबर मार्गदर्शक ठरणारी चांगली पुस्तके वाचा. जीवन उपचाराने नाही तर व्यायामाने बरे होते. खेलो इंडियामध्ये सहभागी व्हा, योगामध्ये सामील व्हा. स्वत:वर विश्वास ठेवा, हार मानू नका. पीएम केअरमधून मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी किंवा खासगी शाळेत प्रवेश, पुस्तके, कपड्यांचा खर्च केंद्र शासन करेल. व्यावसायिक शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल. यासोबतच संकल्प करा, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, खूप मोठे व्हा, तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी 18 वर्षांच्या वरील ओम गुरुनाथ हासुरे-पाटील, विनायक विष्णू यादव, राजवर्धन श्रीकांत दिवसे, किरण सुरेश खवरे यांना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते पीएम केअर कीट (स्नेह प्रमाणपत्र, विमा कार्ड, पासबुक) देण्यात आले.

बालकांना मिळणारा लाभ : अनाथ मुलांना लाभ बालकांची काळजी, संरक्षण करणे, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे आणि वयाच्या 18 ते 23 वर्षांदरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे. 23 व्या वर्षी एकरकमी 10 लाख रूपये केंद्र सरकारचे आणि पाच लाख रूपये राज्य सरकारचे देण्यात येणार आहेत. विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला चार हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते 12 वीपर्यंत 20 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तांत्रिक शिक्षणासाठी 50 हजार शिष्यवृत्ती असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आरोग्य विमा प्रत्येक वर्षी असेल.