बॅंक कर्मचाऱ्यांनी युनियनच्या झेंड्याखाली एकत्र यावे : आनंदराव अडसूळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बॅंक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध न्याय मागण्यासाठी,  तसेच भावी आयुष्यासाठी, सार्वजनिक विकास व त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी को. ऑप. बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केले.

कोल्हापूर येथे सहकारी बँक कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख उपस्थित म्हणून कार्याध्यक्ष नरेंद्र सावंत,  सल्लागार सुनिल साळवी, सरचिटणीस प्रदिप पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

  अडसूळ म्हणाले, नोकरी लावली म्हणून तुम्ही कोणाचे गुलाम होऊ नका. कामाचा योग्य दाम आणि घामाचा सन्मान करण्यात आला पाहिजे, यासाठी आमचा लढा असून बॅंकेच्या हिताला बाधा येईल, अशी आमची कधीच मागणी नसते. यासाठी युनियन महत्वाची असून तुम्ही सहभागी व्हावे असे आवाहन केले.

   युनियन चे कार्याध्यक्ष नरेंद्र सावंत यांनी, आपल्या युनियनमध्ये कोणत्याही प्रकारचे जात, धर्म पंथ, पक्षभेद विसरून सर्वजण एकाच झेंड्याखाली एकत्र येऊन कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम करतात. भविष्यात जिल्ह्यातील सर्व बॅंक कर्मचाऱ्यांनी युनियनमध्ये सहभागी व्हावे, असे सांगितले. यावेळी सल्लागार सुनिल साळवी, किरण अतिग्रे यांची भाषणे झाली. 

   या कार्यक्रमात अपना बॅंकेचे व्यवस्थापक रोलॅंड रिबेरो यांचा सलग तीन वर्षे पारितोषिक मिळाले बदल अडसूळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भुविकास बॅंक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या मान्य झाल्याबद्दल व यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी स्वागत उपाध्यक्ष अनिल पोवार यांनी केले. प्रास्ताविक संजय साळोखे यांनी केले. यावेळी सरचिटणीस मनोहर दरेकर, दिपक पाटील , आजरा बॅंकेचे व्यवस्थापक प्रविण कापसे, एम. पी. पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन भरत जाधव यांनी व आभार राहुल दुकांडे यांनी मानले.