लाल महालातील ‘लावणी’वरून संताप; गुन्हा दाखल

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी राज्य भरातून संताप व्यक्त होत आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लाल महालात लावणी केल्याने भावना दुखावल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार कलम 295, 186 अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. पुण्यातील लाल महाल हा सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे क पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमी लाल महालात जाऊ शकत नसताना या लाल महालामध्ये एका चित्रपटातील लवणीच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक समोर आल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांमधून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान वैष्णवीने या प्रकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडीयामधून माफीनामा देखील जाहीर केला आहे.

१६ एप्रिल २०२२ ला वैष्णवीने लाल महालात व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर बघता बघता तो वायरल झाला. वैष्णवीची रील ही चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर होती. लालमहालात लावणी केल्याच्या घटनेनंतर मराठा महासंघाकडून लाल महाल गोमुत्र, गुलाबपाणी शिंपडून स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच जिजाऊंच्या पुतळ्यावरही दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की लाल महाल या पवित्र वास्तूचे पवित्र्य भंग करण्यात आलं आहे. लावणीवर नृत्य करीत असताना मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मला माझे काम करू न देता त्यांनी व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे अधिक तपास करत आहेत.