कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये 20 मे पासून कृषी प्रदर्शन

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी मोफत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून या कृषी प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

येथील कृषी प्रदर्शनात 300 हून अधिक स्टॉल्स, शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शक सेमिनार्स, प्रात्यक्षिके, स्लाईड-शोज अशा अनेक गोष्टीतून उपयुक्त असे हे कृषी प्रदर्शन संपन्न होत आहे. यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची खते, बियाणे, सिंचन, औजारे तसेच शेती पुरक उत्पादनांचे स्टॉल्स असणार असून शेतीविषयक संपूर्ण माहिती प्रात्यक्षिक व मॉडेलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मिळण्याची सुवर्णसंधी येथे लाभत आहे.

प्रदर्शनात महिला बचत गटांसाठीही स्टॉल्स उपलब्ध असून त्याव्दारे महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. तसेच त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळेच या प्रदर्शनात आपण सहभागी होऊन आपल्या उत्पादनाला हजारो शेतकरी बांधवांपर्यंत पोहचण्याच्या संधीचे सोने करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी निमित्ताने केले आहे.

अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती-
येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीचा वलंब करुन जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, यासाठी प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. कृषीक्षेत्रामध्ये विकसित झालेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या यशोगाथा, शासनाच्या विविध विभागाच्या योजना, उपक्रमांची माहिती अद्ययावत कृषि तंत्रज्ञान, नाविन्यूपर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय इ. बाबत मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व प्रत्यक्ष तंत्रज्ञान, आधुनिक शेती उपयोगी मशिनरी प्रत्यक्ष पाहता यावी याचे प्रात्यक्षिक पाहता यावे याकरिता कृषि प्रदर्शन, कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी व उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

अस्सल हापूस आंबा मिळणार माफक दरात..!
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिल, कोल्हापूर येथे दि. 19 ते 22 मे 2022 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या आंब्यांच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.