कोल्हापूर : किसान मोर्चाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दि. १२ मे ते १४ मे पर्यंत आसामच्या दौ-यावर जात आहेत. एमएसपी गॅरंटी कायद्याची जनजागृती देशभरातील शेतकऱ्यामध्ये सुरू केली असून ईशान्येकडील अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम व त्रिपुरा या राज्यातील शेतकरी प्रश्नांवर रान उठवणार आहेत.
शिलॉंग येथे शेतकरी प्रश्नांवर आठ राज्यातील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून मेघालय येथील मलकी ग्राऊंड येथे पहाडी शेतकरी संघटनेच्या वतीने सभा व रॅली आयोजित केली आहे.
केंद्र सरकारने तातडीने हमीभावाचा कायदा करावा यासाठी देशातील शेतकरी संघटनांनी राजू शेट्टी व व्ही. एम. सिंग यांच्या नेतृत्वाखाली एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रात १५ एप्रिल पासून बळीराजा हुंकार यात्रा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईशान्यकडील राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. त्रिपुराच्या पूर्वेला आसाम आणि मिझोराम ही भारतीय राज्ये आहेत. तांदूळ, नाचणी, ज्वारी, मका आणि कडधान्ये ही या राज्यातील प्रमुख पिके आहेत याशिवाय तेलबिया आणि नगदी पिकांची संख्या. काजू, नारळ, सुपारी, वेलची, मिरची, कापूस, ऊस आणि तंबाखू ही इतर पिके आहेत. ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत.
स्थिर बाजाराचा अभाव, यांत्रिकीकरणाचा अभाव, कृषी पायाभूत सुविधा, शिक्षणाच्या अभावामुळे ईशान्य भारतातील शेतकरी आणि जमिनदार यांच्यात दरी निर्माण झाली आहे. आसाममधील शेतकरी मागासलेला आहे. त्याची उपजिविका ही शेतीवरच अवलंबली आहे. इतर राज्याच्या मानाने आधुनिक उपकरणांचा वापर नगण्य आहे. किमान हमीभावासाठी येथील शेतकरी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. या आठ राज्यातील शेतकरी नेते व शेतकरी एकत्र येऊन येथील शेती प्रश्नासंदर्भात लढा उभा केले जाणार आहे.