कोल्हापूर- रत्नागिरी रोडवर केमिकल टाकून वडाची झाडं जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बरेच वडाची जुनी झाडं आहेत. या झाडांच्या बुंद्यावरच केमिकल टाकून झाड जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराबद्दल निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर खूप जुनी वडाची झाडे आहेत. ही झाडे राजर्षी शाहू महाराजांच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा लावली असल्याचे जुनी जाणकार मंडळी सांगतात. वडाचे एक झाड 200 वर्ष जगते किंबहुना या झाडाच्या पारंब्यातून नवीन झाड वाढते म्हणजे हे झाड अक्षय आहे. पण खोड जळाल्याने हे झाड थोड्या दिवसांनी वाळते. केमिकल टाकून वडाचे झाड मारण्याचा प्रकार केर्ली येथे उघड झाला आहे. वृक्ष लागवडीसाठी शासन व सामाजिक संस्था अनेक वेळा पुढाकार घेतात. यासाठी शासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कोरोना काळात तर ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने झाडांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.  मात्र काही महाभागांकडून झाड नष्ट करण्यासाठी झाडाच्या बुंद्यावर अॅसिड टाकून ते जाळण्याचा प्रकार होत आहे. झाडांची कत्तल करणाऱ्याना शिक्षा मिळायला हवी, मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.