हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेचे लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्यावतीने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप यांच्या कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले.

शासनाने दि 29 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमुळे सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आरोग्य सेवकाला पदोन्नतीसाठी विज्ञान शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असल्याची जाचक अट घातल्यामुळे राज्यातील हिवताप कर्मचारी यांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागले आहे. या अधिसुचनेमुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देता आलेला नाही. त्याच्या निषेधार्थ राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्यावतीने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

हा प्रश्न तात्काळ सोडवला नाही तर राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे व सरचिटणीस पी. एन. काळे यांनी व्यक्त केला. या आंदोलनात कोल्हापूर सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नितीन कांबळे, सरचिटणीस राकेश घोडके, , सुधिर खाडे,  मोतीलाल वड्ड, सूरज नेतेले, बजरंग शिंदे, दिनकर कुंभार, बाजीराव चौगले, जे. के. कांबळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.