सरुड : सरुड (ता. शाहूवाडी) येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी शिबिरार्थींनी भेडसगांव येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात अस्ताव्यस्त अडगळीत पडलेल्या प्राचीन वीरगळांची स्वच्छता करून पुनर्स्थापना केली.
भेडसगांव येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात प्राचीन आणि सांस्कृतिक अर्थाने महत्व असणाऱ्या वीरगळ अस्ताव्यस्त पडलेल्या पाहून शिबिरार्थींनी कुतुहलातून प्राध्यापकांकडून माहिती घेतली. ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व जाणून सर्व वीरगळांची स्वच्छता करून मंदिर परिसरात पुनर्स्थापना केली.
वीरगळ जतनाबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. यामध्ये शेकडो वर्षांची परंपरा सोबत घेऊन पुढे आलेल्या या वीरगळ दोन राज्यांतील करारांचे तसेच गावासाठी बलिदान दिलेल्या शहिदांची स्मृती जतन करतात. शाहूवाडी तालुक्यातील सरुड, शिरगांवसह अनेक ठिकाणी अशा वीरगळ आहेत. हा कोरीव शिल्प प्रकार शिल्पकलेतील अजोड नमुना आहे. हा ठेवा जपण्यासाठी या शिबिरार्थींनी केलेल्या या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
यावेळी शिबिरार्थींनी गावातील रस्ते, गटारे, मंदिर, तसेच गावतळ्याची स्वच्छता करून ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला. शिव शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश वाघमारे, डॉ. सुगत बनसोडे, प्रा.प्रकाश नाईक, प्रा. रघुनाथ मुडळे यांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभले.