मुंबई : ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा अशी मागणी जयंत पाटील यांनी आज सभागृहात केली.
काल सभागृहात भाजपचे सदस्य उपस्थित नव्हते असे जयंत पाटील म्हणाले त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो ‘डंके के चोटे पे’ गेलो. काय आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे असे ओरडतच सांगितले.
यावर बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले. ‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजप आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून डिस्टर्ब करत असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील संतापले. खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा आम्हालाही खाली बसून बोलता येते त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका असे स्पष्ट शब्दात खडे बोल सुनावले. सभागृहात पहिल्यांदाच शांत असणारे जयंत पाटील संतापलेले पाहायला मिळाले. यावेळी ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजप सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली.