जीवनविद्या मिशनच्या अभियानास आता ग्रामविकास विभागाची ताकद : प्रल्हाददादा पै

व्हन्नूर : बालसंस्कार, युवा संस्कार व महिलांना समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने जीवनविद्या मिशनचे अभियान सुरू होते. आता ग्रामविकास विभागाची शासकीय ताकद या अभियानाला मिळाली आहे. त्यामुळे हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक जोमाने करु,  असे प्रतिपादन सद्गुरु वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हादादा पै यांनी केले.

  व्हन्नुर (ता. कागल) येथे ग्रामविकास विभाग व जीवनविद्या मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियानाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

       ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जीवनविद्या मिशनला शासनाची सहयोगी संस्था म्हणून ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील काही गावे दत्तक घेऊन विचारांचे आदान-प्रदान होईल. याअंतर्गत स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, हागणदारीमुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, वृक्षारोपण, समाज प्रबोधन, राष्ट्रभक्ती अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जीवनविद्या मिशन संस्थेच्या पाठीशी महाराष्ट्र शासन हिमालयासारखे उभी राहील.   

व्हन्नूर ग्रामपंचायतीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच सौ पूजा रणजीत मोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, आनंदराव राणे, आनंद राणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.