महाविकास आघाडीतील २५ आमदार भाजपच्या संपर्कात : रावसाहेब दानवे

जालना : महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असून निवडणुका लागल्या की ते भाजपमध्ये येतील, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

  दानवे म्हणाले, महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. मात्र, ते सावरले आणि त्यांनी बहिष्कार टाकला नाही. मात्र, जशा निवडणुका लागतील तसे ते सर्वजण भाजपमध्ये येतील. आम्ही कधीच कोणाच्या पाठीत वार केला नाही. यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युती तोडली. ज्या दिवशी शिवसेनेने आम्हाला सोडले आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतलंय आणि आता हिरव्याचं समर्थन करतात. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा-भगवा करतात. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिलेली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे.

  निधी वाटपात अर्थमंत्री अजित पवार शिवसेना आमदारांवर अन्याय करत असल्याने शिवसेनेचे  आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत जातील, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. पण ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील. संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असेही दानवे म्हणाले.