कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर वातावरणात तापू लागले आहे. कॉंग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी सत्यजित उर्फ नाना कदम यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे जयश्री जाधव आणि सत्यजित कदम या दोन माजी नगरसेवकातच सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
कै. चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे आघाडी धर्मानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकासाठी ही जागा काँग्रेसला जाणार असल्याने जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळजवळ जाहीर झाल्यात जमा आहे.
जयश्री जाधव या महापालिचेच्या गत सभाग्रहात भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. मात्र त्या भाजपकडून लढणार नसतील तर येथे भाजप उमेदवार देईल असे सांगितले होते.भाजपचे विरोधी भाजपकडून सत्यजित कदम यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे. याबाबतची घोषणाही लवकरच होणार आहे. आणि दोन माजी नगरसेवकात विधानसभेचा सामना होण्याची शक्यता आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली असली तरी त्यांना मातोश्रीच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मातोश्रीवरून आदेश आल्यास निवडणूक लढू’ असा त्यांचा पवित्रा आहे. राज्यात २०१९ पासून काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. आणि आता भाजप चार राज्यात मिळलेल्या यशामुळे महाविकास आघाडीचे नेते धोका मैत्रीपूर्ण लढतीचा धोका पत्करतील असे वाटत नाही त्यामुळे कॉंग्रेस व भाजप असाच सामना होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, दौलत देसाई, माणिक पाटील-चुयेकर, सचिन तोडकर यांनी उमेदवारीची मागणी केली असली तरी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे.
ही निवडणूक महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच होत असल्याने महाविकास आघाडी आणि भाजपाकडून ताकद आजमावली जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम ठरणार आहे.
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आघाडीच्या नेत्यांबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना भेटणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.