स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेच्या कामांना मंजुरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत, जिल्हयातील हागणदारीमुक्त गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF+) करण्याच्या दृष्टिने पाणी व स्वच्छता विभागामार्फत कामकाज सुरू आहे. जिल्हयातील स्वच्छता सुविधांच्या कामांनी वेग घेतला आहे. ग्रामपंचायत स्तरावर निर्माण होणा-या सांडपाण्याच्या व घनकच-याच्या व्यवस्थापनासाठी वर्ष 2022 मध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी एकूण 257 कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे तर घनकचरा व्यवस्थापनासाठी एकूण 85 कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे.
जिल्हयातील वैयक्तिक शौचालय सुविधा नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी 3148 उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून तरंगत्या लोकसंख्येसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 270 सार्वजनिक शौचालय बांधकामांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली.

जिल्हयातील मंजूर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांसाठी एकूण 318.50 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम करून वापर करणा-या लाभार्थ्याला प्रोत्साहन अनुदान वाटपासाठी 377.76 लक्ष इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रांची गावे, जास्त वर्दळीची, बाजाराची गावे, मोठया लोकसंख्येच्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालय युनिटसाठी तीन लाख रुपयांचा निधी देण्यात येत आहे. यावर्षी जिल्हयातील 270 सार्वजनिक शौचालय युनिट बांधकामासाठी 702.00 लक्ष इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

स्वच्छता अभियानात कोल्हापुर जिल्हा हा नेहमीच राज्य व देशपातळीवर अग्रेसर राहीला आहे. जिल्हाला मिळालेला नावलौकिक व शाश्वत स्वच्छता कायम राहावी यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापुढेही स्वच्छतेच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी विविध अभियान व उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मार्च 2022 अखेर घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय बांधकाम व वैयक्तीक शौचालय बांधकाम उद्दीष्टानुसार कामे पूर्ण करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हयातील सर्व पंचायत समितीना दिल्या आहेत.