जोतिबावरील आंदोलन चिघळल्यास शासन-प्रशासन जबाबदार : राजू शेट्टी

जोतिबा : जोतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकाकरिता ई पासची सक्ती रद्द करून देवस्थान समितीचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तोडगा काढावा. आंदोलन चिघळल्यास भाविकांच्या गैरसोयीस शासन व प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा माजी खासदार राजू शेटटी यांनी दिला.
जोतिबा मंदिराबाहेर सुरू असलेल्या आंदोलनामुळे भाविकांच्या होणा-या गैरसोयीसाठी जोतिबा ग्रामस्थ व पुजारी यांनी घेतलेली आंदोलनाची भूमिका योग्यच आहे. प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील गैरसमजुतीमुळे आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थ, दहा गावकर व पुजारी यांच्यावर आलेली आहे. एकीकडे पंतप्रधानांपासून ते राज्यातील मंत्र्यापर्यंत सर्वजण राजरोसपणे हजारो लाखोच्या सभा करत आहेत, निवडणूक घेत आहेत, विजयी मिरवणुका निघत आहेत. प्रशासनाकडून त्याठिकाणी कोणतेच निर्बंध घातले जात नाहीत. मात्र, प्रशासनाकडून निर्बंधाच्या नावाखाली भाविकांना ई पासच्या केलेल्या सक्तीमुळे गर्दी वाढत असून दररोज १ तासात २ हजार पास दिले जातात. पण यामध्येही बोगसगिरी होत असून कोणतीच माहिती न घेता माझ्यासह पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे बोगस पास काही सेकंदातच याठिकाणी काढले गेले आहेत.
जोतिबा चैत्र यात्रेच्यानिमित्ताने दररोज दोन लाख भाविक येतात व प्रशासनाकडून मात्र दररोज २४ हजार भाविकांनाच पास देण्याची क्षमता आहे. सध्या ग्रामस्थ, पुजारी व दहा गावकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे देवस्थान ठिकाणी संपूर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होऊ लागली आहे. याबाबत राजू शेटटी यांनी या सर्व घटनेची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख यांना देऊन उद्या बैठक घेऊन यामध्ये तातडीने तोडगा काढणेबाबत सुचित केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई, सुनिल नवाळे ,सरपंच सौ. राधा बुबणे, शंकर दादर्णे, गोरख बुबणे यांचेसह ग्रामस्थ व पुजारी उपस्थित होते.