मागितला चुना अन् खुपसला सुरा; राधानगरीतील कुंभारवाडीत खून

राधानगरी : तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारामारीतून एकाचा खून झाल्याची घटना राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली. अनिल रामचंद्र बारड (वय ४७) असे खून झालेल्याचे नाव आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, जितेंद्र केरबा खामकर (खामकरखाडी) व विकास नाथाजी कुंभार (कुंभारवाडी) या दोघांमध्ये बुरंबाळी येथील हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तंबाखूला लावण्यासाठी चुना मागितल्यावरून वाद झाला. तू माझ्याकडेच चुना का मागितला या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. धामोड व कुंभारवाडी येथील तरुणांचे दोन गट आमने सामने आल्याने किरकोळ वादाचे पडसाद तुंबळ हाणामारीत झाले. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने मामा अनिल रामचंद्र बारड याला बोलावून घेतले. व रात्री अकरा वाजता ते दोघे कुंभारवाडी येथे गेले. यावेळी संशयित आरोपी विकास कुंभार याने आपल्याजवळ असलेल्या धारदार चाकूने अनिल बारड यांच्यावर वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.