चंदगडचा जवान आसामच्या सीमेवर शहीद

चंदगड : चंदगड तालुक्यातील करंजगावचे जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) आसाम येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी कळवली.

 नितेश हे आठ वर्षांपूर्वी मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. गेल्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्यांची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. जवान नितेश मुळीक हे आसाम येथील सीमेवर सेवा बजावत होते. सीमेपलीकडून अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात नितेश शहीद झाले. नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करंजगावात आणले जाणार आहे. करंजगाव येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.