इटावा: इटावा-मैनपुरी मार्गावर एका वेगवान कारला भीषण अपघात झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. भरधाव कारचं अचानक चाक फुटल्यानं अनियंत्रित कारने थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवरील एका वेगवान ट्रकला जोरदार धडक मारली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की कारमधील 6 फोटोग्राफर्सच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
संबंधित सर्व फोटोग्राफर्स एका कार्यक्रमानिमित्त फोटो काढण्यासाठी जात होते. पण नियतीनं त्यांनाच फ्रेममध्ये कायमचं कैद केलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सर्व फोटोग्राफर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जसवंत नगर येथून निघाले होते.
इटावा-मैनपुरी रस्त्यावरून भरधाव वेगानं जात असताना अचानक कारचा पुढील टायर फुटला. गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने दुसऱ्या लेनवर पोहोचली. दरम्यान विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मिनी ट्रकला कारने जोरदार धडक दिली.समोरून येणाऱ्या ट्रकचा देखील वेग अधिक असल्यानं कारचं इंजिन तुटून बाजूच्या शेतात जाऊन पडलं आहे. तर कारची चाकं हवेत उसळताना दिसली. कारचं इंजिन तुटून बाहेर पडताच अपघातग्रस्त कार मिनी ट्रकच्या आतमध्ये घुसली होती. या दुर्दैवी अपघातात सहा फोटोग्राफर्सचा जागीच मृत्यू झाला आहे.