उचगाव : कोरोना महामारीच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून उचगाव (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर व परिचारिकांनी कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल करवीर शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जागतिक महिला दिनी त्यांचा सन्मान करून भगवा सलाम करण्यात आला.
यावेळी शाल, श्रीफळ आणि फेटा देऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव सन्मान करताना म्हणाल्या, डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला धोका पत्करून कोरोना काळात अनमोल सेवा दिली. ज्या जिजाऊंनी संस्काराच्या शिदोरीतून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले त्या जिजाऊ मातेच्या पाऊलखुणा जपत महिलांनी संस्कारातून भारत सामर्थ्यशाली बनवावा.
यावेळी डॉ. बर्गे, डॉ. पाटील, परिचारिका समुद्रे व कुरणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. करवीर महिला आघाडीच्या करवीर तालुका प्रमुख राजू यादव, ग्रामपंचायत सदस्या अर्चना करी, स्वाती जाधव, जयश्री रेडेकर, रूपाली स्वामी, छाया घोरपडे, मीना पवार, विभागप्रमुख दीपक रेडेकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, योगेश लोहार, महादेवी स्वामी, सुनंदा चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रियांका पाटील यांनी स्वागत केले. शीतल रेडेकर, अर्चना खाडे, वासंती पाटील,अलका यादव यांनी संयोजन केले. स्नेहल सांगलीकर यांनी आभार मानले.