सीएनजी गाड्या असणाऱ्यांना मोठा झटका

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी सीएनजी गाड्यांना पसंती दर्शवली. मात्र, पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाडी घेतलेल्यांना मोठा झटका बसला आहे.नागपूरात पेट्रोल-डिझेल पेक्षा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

नागपूरात सीएनजीचे दर प्रतिकिलो 120 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. नागपूरमध्ये सीएनजी पाईपलाईन नसल्याने सरकारी सबसिडी मिळत नाहीये आणि याचा थेट परिणाम सीएनजीच्या किमतीवर झाला आहे.गुजरातमधून एलएनजी आणून नागपूरमध्ये सीएनजीत रूपांतर करण्याचा खर्च जास्त होत आहे. त्यामुळे देशात सर्वात महाग सीएनजी सध्या नागपूरमध्ये मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी 100 रूपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरात तब्बल 20 रूपयांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे एलएनजीचे दर आधीच वाढले आहेत. त्यात रस्ते मार्गाने एलएनजी आणून त्याचं रूपांतर सीएनजीमध्ये करण्याचा खर्च भरपूर आहे. परिणामी नागपूरमध्ये सीएनजीच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे नवीन सीएनजी गाड्या खरेदी केलेल्या अनेकांना आपण चूक केल्याचं वाटत आहे.