कोल्हापूर : दीर व भावजय यांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू भोकसून त्याचा खून केल्याप्रकरणी राजारामपुरीतील एकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शनिवारी जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
प्रसन्न उर्फ बाळू उर्फ बळी सज्जन साठे (वय ४९ रा. मातंग वसाहत, राजारामपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
आरोपी प्रसन्ना उर्फ बाळू साठे आणि त्यांची भावजय यांच्यात कौटुंबिक कारणातून २१ एप्रिल २०१८ मध्ये वादावादी सुरू होती. आरोपीने भावजयीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. दीर, भावजय यांच्यातील वादात संदीप बेरड (रा. पाचवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपीने आमच्या भांडणात भाग घ्यायचा तुझा काय संबंध, असा सवाल करीत चाकूने वार केला. यात संदीप बेरड याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध राजाराम पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले.