विविध धार्मिक कार्यकम; मंदिरात पहाटेपासूनच गर्दी
कोल्हापूर : हर हर महादेवचा अखंड जयघोष आणि भाविकांच्या उदंड उत्साहात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्री मंगळवारी साजरी करण्यात आली.
अभिषेक भजन, प्रवचन, किर्तन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हर हर महादेवच्या गजरात महादेवाला महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक, प्रसाद वाटप करण्यात आले.शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या अतिबलेश्वर, काशी विश्वेश्वर, कपिलतीर्थ, उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर, रावणेश्वर, चंद्रेश्वर, वटेश्वर, कैलासगडची स्वारी, लक्षतीर्थ, कोटीतीर्थ सोमेश्वर मंदिरासह स्टँड परिसरातील वटेश्वर मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी होती. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कित्येक मंदिरांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, कोल्हापूर शहराजवळील वडणगे तसेच सातेरी महादेव डोंगर, चक्रेश्वरवाडी, कसबा बीड, कणेरी मठ, भेडसगावसह विविध गावांमध्ये महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी होती. अभिषेकासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.