पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 6 मार्च रोजी पुणे शहरात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत.
शिवाय, पुणे महापालिका भवन आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे अनावरण करणार आहेत.मोदींच्या या दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान हे गरवारे स्थानक ते आनंदनगरपर्यंत मेट्रो प्रवास करणार असून, जाहीर कार्यक्रमाद्वारे पुणेकरांना संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे.’दरम्यान, महापौरांनी या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली.
याबाबतच्या बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.