
कोल्हापूर : उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे.
उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व जाळपोळ होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी ठिकाणापासून 2 किमी परीघ व्यासामध्ये आज दि. 22 फेब्रुवारी रोजी रात्री 12.00 ते दि. 8 मार्च रोजी रात्री 12.00 या कालावधीत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये उचंगी प्रकल्पासाठी कार्यरत अधिकारी/कर्मचारी/पोलीसवर्ग, कामासाठी उपयोगात येणारी वाहने, मशीनरी, संसाधने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची वाहने संचार करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती व वाहनांना परवानगी शिवाय संचार करण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी बंदी घातली आहे.
उचंगी लघुपाटबंधारे काम सन-2000 पासून सुरु असून उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी केलेले मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडले आहे. धरणाच्या अंतिम टप्यातील घळभरणीचे काम सुरु असून वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचा व घळभरणीचे काम पूर्ण झाले की उर्वरित मागण्या मान्य होणार नाहीत असा धरणग्रस्तांचा झालेला समज व काही प्रकल्पग्रस्त हे घळभरणीचे काम बंद पाडण्यासाठी एक जमाव करुन धरणाचे कामकाज बंद करुन तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व जाळपोळ करण्याची दाट शक्यता आहे. यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
आदेशापूर्वी संबंधितांना नोटीस बजावणी करणे शक्य नसल्याने, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. बंदी आदेश धरणाचे कामकाज करणारे अधिकारी/कर्मचारी/कंत्राटदार/पोलीस अधिकारी, कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमुद आहे.