कोल्हापूर : करवीरनगरी मध्ये तारखेनुसार होणाऱ्या शिवजयंतीची तयारी जल्लोषात सुरू असून शिवाजी तरुण मंडळाने १६ फुटी अश्वारुढ शिवरायांच्या पुतळय़ाची प्रतिकृती उभारली आहे.

जल्लोषी वातावरणात त्याचे अनावरण करण्यात आले. तारखेनुसार होणाऱ्या या सरकारी शिवजयंतीच्या तयारीची लगबग शहरात सुरू झाली आहे. शिवज्योत,प्रतिमापूजन, मिरवणुका, व्याख्यान आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिकृती केली आहे. त्याचे अनावरण पारंपरिक वाद्यांच्या तालात, शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. या वेळी सादर करण्यात आलेल्या पोवाडय़ाने चैतन्य जागले.किल्ले पन्हाळगडाकडे जाणारा मुख्य रस्ता अतिवृष्टीने खचला आहे. यामुळे बुधवार पेठ, रेडे घाट, लता मंगेशकर बंगला, अंधारबाव हा पर्यायी मार्ग शिवज्योत नेण्यासाठी सुरू राहणार आहे, असे तहसीलदार गणेश शेंडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. तर जिल्हा प्रशासनाने करोना नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.