बीड जिल्ह्यातील मुलींचा घटता जन्मदर चिंताजनक

बीड : बीड जिल्ह्यातील मुलींचा घटलेला जन्मदर चिंताजनक असून करोनाच्या काळात मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भिलग तपासणीचे प्रमाण वाढले.

प्रशासकीय यंत्रणाही करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेत व्यस्त होती. त्यामुळेच मुलींचा जन्मदर घटला, अशी कबुली वैद्यकीय गर्भावस्था समाप्ती कायदा आणि गर्भधारणा पूर्व, प्रसवपूर्व निदानतंत्र राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी बुधवारी येथे दिली. मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने एक व्यापक चळवळ हाती घेण्यात येणार असून पुढील पंधरा दिवसात त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे डॉ. मिरगे म्हणाल्या.

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोनोग्राफी, गर्भपात केंद्र तपासणी आणि जिल्हा सल्लागार समितीची आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर डॉ. मिरगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सदस्या वैशाली मोटे, शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते.