सोलापूर/पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरीत लाखो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे कोविड लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 8 ते 9 लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
त्यामुळे, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना रांगेत 7-8 तास वाट पाहावी लागत आहे.पंढरीत माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेला भाविक पहाटे चंद्रभागेचे स्नान करून विठोबाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत जाऊन थांबत होता. ज्यांना दर्शन रांगेत थांबून दर्शन घेत नाही असे भाविक विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन प्रदक्षीणा मारून यात्रा पूर्ण करण्याचे समाधान मानत होते. यामुळे विठ्ठल मंदिराच्या परिसरात, चंद्रभागा वाळवंटात, प्रदक्षिणा मार्गावर, दर्शन रांगेत मठात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याचबरोबर मंदिर समितीकडून मंदिरात कोरोना संसर्गजन्य रोगाचे निर्बंध पाळण्यात येत होते.