कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षे स्थगित केलेले महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित दोन सामने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसात खेळविण्यात येणार आहेत. जरी दोन वर्षानंतर शाहू स्टेडियमवर सामने होत असले तरी सामान्य फुटबॉल शैाकिनांना मात्र मैदानावर प्रवेश असणार नाही. कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहातील हाही पहिलाच प्रसंग असेल.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शाहू स्टेडियमवर महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतु कोरोना संसर्ग सुरु झाल्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेतील एक उपांत्य व अंतिम सामना स्थगित ठेवण्यास भाग पाडले. गेल्या दोन वर्षापासून सामने कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व जिल्हा प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमात शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सामने घेतले जाणार आहेत. सामने पाहण्यास फुटबॉल शौकिनांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही. सामन्याचे युट्यूबवर थेट प्रसारण होणार आहे.