उद्या राज्यभरात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रती थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला सत्तेतून दूर केल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या सर्व नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचा असतात याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत असं त्यांनी सांगितले.