गोकुळ दूध संघाशी संलग्न दूध संस्थांच्या टीडीएस परताव्यासाठी चेतन नरकेंचा पाठपुरावा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाशी सलग्न ५२६० इतक्या दूध संस्था कार्यरत आहेत. पैकी सुमारे ६४१ संस्थांची उलाढाल ५० लाखाहून जास्त आहे. ५० लाखाहून अधिक उलाढाल असणाऱ्या दूध संस्थाच्या बिलातून ०.१% टीडीएस आकारला जातो. आणि हि रक्कम दूध संघाकडून संस्थेच्या दूध बिलातून कपात करून त्या त्या संस्थेच्या पॅन नंबरच्या आयकर खात्याला भरली जाते. सदर दूध संस्थेच्या टीडीएस परताव्यासाठी गोकुळचे संचालक चेतन नरके यांचा पाठपुरावा सुरू असून यासाठी युथ बँकेत मार्गदर्शन कक्ष सुरू केला आहे.

साखर कारखाने आणि सहकारी बँका वगळता इतर सहकारी संस्थाना ८० पी अंतर्गत आयकरात सवलत आहे. त्यामुळे वेळेत आयकर विवरण पत्र दाखल केले तर कपात केलेल्या टी.डी.एस ची रक्कम संस्थांना परत मिळते. आयकर विवरण पत्र भरून देण्यासाठी द्यावे लागणारे शुल्क आणि संपूर्ण माहिती अभावी विवरण पत्र मुदतीत भरले जात नाहीत. आयकर नियमाप्रमाणे दरवर्षी आयकर विवरण पत्र भरत गेले नसल्याने कपात केलेल्या टीडीएस च्या रकमेचा परतावा मिळत नाही यामुळे अनेक दूध संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.यासाठी युथ बँकेच्या वतीने सहकारी संस्थाना आयकर विषयी जागृती, माहिती, सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे. यामध्ये सहकारी संस्थाना आयकर विवरणपत्र भरणे आणि संबंधित सेवांचा लाभ मिळणार आहे. या कामासाठी तज्ञ लोकांची नेमणूक केली आहे. यामुळे सहकारी दूध संस्थाना टी.डी.एस.परतावा मिळण्यास मदत होणार आहे तसेच आयकर विवरण पत्र वेळेत दाखल होतील आणि आयकर नियमांचे अनुपालन आणि पाठपुरावा वेळेत होण्यास मदत होईल.याचसोबत अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचा परवाना मिळवण्यासाठी देखील कक्ष सुरु करण्यात आला आहे. याचा सर्व सहकारी दूध संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन युथ बँक आणि गोकुळचे संचालक नरके यांनी केले आहे.