पुणे : काही वेळा असे संशय सत्य स्थिती बाहेर आणण्यास पूरक ठरतात. पुण्यातील एका प्रकरणात काहीसं असंच पाहायला मिळालं. पत्नीला पतीच्या वर्तनावर संशय आला आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिनं पतीच्या कृत्याचा पर्दाफाश केला.
पुण्यात एका हॉटेलमध्ये रुम घेण्यासाठी पत्नीच्या आधार कार्डाचा वापर केल्याप्रकरणी एका व्यावसायिक आणि त्याच्या मैत्रीणीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी या व्यावसायिकाला अटक केली असून, त्याची मैत्रीण अद्याप फरार आहे. याप्रकरणी पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘गुजरातमधल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीला त्याच्या वर्तनावर संशय आल्याने, तिनं आपल्या पतीवर लक्ष ठेवण्यासाठी एसयूव्हीमध्ये जीपीएस ट्रॅक बसवला. यातून जे सत्य बाहेर आलं, त्यानं या व्यावसायिकाचा पर्दाफाश केला.पत्नीच्या आधार कार्डाचा वापर करून या व्यावसायिकानं आणि त्याच्या मैत्रिणीनं पुण्यातील हॉटेलमध्ये रूम मिळवली. याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर व्यावसायिकाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेली व्यक्ती गुजरातमधील उद्योगपती असून, त्याची पत्नी कंपनीत डायरेक्टर आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.