कोल्हापूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना सन 2024 पर्यंत दरडोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 90 दिवसाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेसाठी जल जीवन मिशन चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन आज (शुक्रवारी) जिल्हा परिषद चे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पाटील यांचे हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जल जीवन मिशन, स्वच्छता भारत मिशन तसेच माझी वसुंधरा या विषयांबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठीक ठिकाणी चित्ररथ फिरवून जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, महिला बालकल्याण सभापती शिवानी भोसले, समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ, जि. प. सदस्य शिवाजी मोरे, स्वरूपाराणी जाधव, सदस्य, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अरुण जाधव, जल जीवन मिशन प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, आदि उपस्थित होते.