राजारामच्या वतीने ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक

कोल्हापूर: ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांच्या श्रमात व खर्चात बचत व्हावी आणि मनुष्य बळाच्या कमतरतेवर मात करता यावी तसेच ऊस शेतीतील अद्यायावत तंत्रज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने संचालक मा.अमलजी महाडिक यांच्या संकल्पनेतून सभासद शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले.

कारखान्याचे पुलाची शिरोली येथील सभासद शेतकरी श्री. शिवाजीराव पाटील आणि कसबा बावडा येथील सभासद शेतकरी श्री. राजाराम पाटील यांच्या प्लॉटवर झालेल्या या प्रात्यक्षिक प्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा. दिलीप पाटील यांच्यासह सर्व संचालक, कारखान्याचे अधिकारी व सभासद, शेतकरी उपस्थित होते. या दोन्ही ठिकाणच्या प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांनी अश्या शेती विषयक नवतंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ऊसाचे उत्पादन वाढवावे तसेच उत्पादन खर्चात बचत करावी. यासाठी कारखान्यामार्फत ऊस विकास योजना राबविल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून ड्रोनद्वारे औषध फवारणीचा राबवलेला हा उपक्रम निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल, असा विश्वास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.आ.महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सभासद शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.