मुंबई : काही पाश्चात्त्य देशांनी मुखपट्टीची सक्ती काढून टाकल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीतील कोविड सादरीकरणात समोर आल्यानंतर त्या निर्णयाला काही वैद्यकीय-वैज्ञानिक आधार आहे काय याचा अभ्यास कृती गटाने (टास्क फोर्स) करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
त्याचबरोबर राज्यात लसीकरण वाढवण्यासाठी लोकांमध्ये जागृती करणे, त्यांना पटवून देणे यासाठी सर्व मंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याची चर्चाही यावेळी झाली.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेहमीप्रमाणे कोविड सादरीकरण झाले. त्यात राज्यातील परिस्थिती, देशातील परिस्थिती व आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती यांची आकडेवारी व इतर माहिती देण्यात आली. काही पाश्चात्त्य देशांनी मुखपट्टी वापराचे बंधन काढून टाकल्याचा उल्लेखही त्या सादरीकरणात झाला. त्यावर हा निर्णय नेमका काय अशी विचारणा झाली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण त्याबाबतची चित्रफीत पाहिल्याचे सांगितले. तसेच वरकरणी तरी हा राजकीय निर्णय वाटतो. पण त्यास काही वैद्यकीय-वैज्ञानिक आधार आहे काय व त्याचे परिणाम काय याबाबत कृती गटाने अभ्यास करून माहिती द्यावी, असे ठाकरे यांनी सांगितले.