सिंहासनावर आरूढ होणार अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ

सोलापूर : भक्तांच्या प्रार्थनेला ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असा धीर देणार्‍या अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे काम मोठ्या गतीने सुरू आहे. गाभार्‍यासह मंडप आणि मंदिराला नव्याने झळाळी दिल्यानंतर मयुरासनाच्या रूपात स्वामी समर्थ यांची मूर्ती बसविण्यात येणार आहे. ती सिंहासनावर आरूढ करण्यात येणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

यासाठी 20 हून अधिक राजस्थानी कारागिर कार्यरत आहेत. कोरोना महामारी आणि निर्बंधामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या कमी झाल्याने हे काम पूर्ण करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. गाभारा दगडाने बांधण्यात आला आहे. त्याला रंग दिल्याने मूळ दगडी रुप नष्ट झाले आहे.

मंदिराच्या निर्मितीनंतर सुशोभीकरणाचे पहिल्यांदाच काम हाती घेण्यात आले आहे. देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी विविध देवस्थानचे पदाधिकारी आणि वास्तुविशारद यांच्याशी चर्चा करुन मंदिराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेत हे काम सुरू केले. यामुळे भाविकांना नव्या रुपातील मंदिरासह गाभार्‍यात विराजमान होणारी स्वामी समर्थांची मूर्ती भावणार आहे. 12 दिवसांपूर्वी हे काम हाती घेण्यात आले आहे. गाभार्‍याचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.