कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणीकृत बालगृहांतील विनाअनुदानित आणि शासन अनुदानित प्रकारच्या जिल्ह्यातील दोन बाल स्नेही बालगृहास संगोपन मासिकाच्या वतीने ‘संगोपन पुरस्कार-२०२१’ देऊन गौरविण्यात आले या समारंभात न्या. पंकज देशपांडे बोलत होते.
जिल्हा स्तरीय अनुदानित बालगृह संगोपन पुरस्कार -२०२१ दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित मुलांचे निरीक्षणगृह बालगृह आणि विनाअनुदानित बालगृह अवनी संस्था संचलित अवनी बालगृह या संस्थांना तसेच लेखनातून समाजप्रबोधन कार्यासाठी ‘संगोपन विशेष पुरस्कार’ डॉ.शुभदा दिवाण यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे शिवाय अशा अत्याचारातील पिडीत बालकांचे वय कमी कमी होत आहे दुसरीकडे या प्रवृत्ती मात्र कायम आहेत. या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असेही देशपांडे यांनी सांगितले. संगोपन मासिक हे केवळ एक नियतकालिक नसून कोरोनामध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सोबत कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्यात ‘संगोपन अभियान’ सुरू केले आहे त्यामुळे बाल हक्कांच्या संरक्षणासाठीची ही चळवळ संगोपन मासिकाच्या माध्यमातून रूजवली जात असल्याचे गौरवोद्गार बाल अधिकार कार्यकर्ते विकास सावंत यांनी काढले. कोरोना महामारीच्या काळात बालगृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव संपादक अतुल देसाई यांनी केला तसेच संगोपन पुरस्कार आणि त्यामधील निवड प्रक्रिया याविषयी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाची सुरुवात सायबर क्राईम या विषयावर पथनाट्य सादरीकरणातून करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, प्रा. डॉ. दिपक भोसले, दि कोल्हापूर जिल्हा पोलीस को आॅप. क्रेडिट सोसायटीचे संचालक जितेंद्र कुलकर्णी, संगोपन मासिकाच्या व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता देसाई, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, शिक्षण विभागाचे बी.बी.पाटील, प्रथम एज्युकेशन संस्थेचे सुधाकर भदरगे, विधी सेवा प्राधिकरणाचे राजीव माने, जिल्ह्यातील सर्व बालगृहांचे अधिक्षक आणि सायबर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन तेजश्री मेटकरी यांनी केले तर आभार संगोपन मासिकाचे संचालक उमेश पाठक यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सायबर महाविद्यालयात करण्यात आले होते.