दूध संस्थांना संकलन बंदचा आदेश म्हणजे सत्ताधारींचा मनमानी कारभार

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दूध संस्थांना संकलन बंद करण्याचा आदेश देऊन गोकुळचे सत्ताधारी सत्तेचा मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनात म्हटले आहे, गडमुडशिंगीतील त्या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून लढा देण्याचे धाडस दाखवले. अशा इतरही संस्था आहेत, ज्यांच्यावर अशाच प्रकारे अन्याय झाला आहे. तेही हळूहळू समोर येतील, अशी अपेक्षा आहे. फक्त दगड-विटांच्या चार भिंती नव्हे, तर लाखो लोकांचे कष्ट, त्यांचे आशीर्वाद आणि विश्वास म्हणजे सहकार असतो. याचा विसर कदाचित गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना पडला आहे. संघात मनमानी कारभार आणि सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. १८ तारखेला मला माहिती मिळाली की, गोकुळमध्ये अनधिकृतपणे काही निर्णय घेतले आहेत. हे निर्णय घेताना सहकाराचे नियम पाळले नाहीत. बुधवारी (१९) स्वतः संघात याची पडताळणी केली. संचालक या नात्याने संबंधित विषयाची माहिती अधिकाऱ्यांकडे मागितली. तेव्हा काही माहिती उपलब्धच नाही व जी उपलब्ध आहे, ती अध्यक्षांना विचारल्याशिवाय देऊ शकत नाही, अशी उत्तरे दिली. तरीही संयम ठेवून अध्यक्षांना भेटून विचारणा केली. मंगळवार (२५) संघाची संचालक मंडळाची बैठक आहे. यात प्रश्नांची उत्तरे मिळतील.असेही त्या म्हणाल्या.