कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यास शिवसेना इच्छुक आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी करून ही पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आज (सोमवारी) शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना खासदार मंडलिक म्हणाले की, महाविकासआघाडीची सुरुवात कोल्हापुरातून झाली. त्यामुळे महाविकासआघाडीला कुठे धक्का लागू नये असे आम्हालाही वाटते. पण काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने शिवसेनाही मागे राहणार नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक शिवसेना लढवणारचं असे खा.मंडलिक यावेळी म्हणाले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर, आ.प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर,उल्हास पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे,संजय पवार, शहर प्रमुख विशाल हारुगले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.