दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीचा भाजपकडून लढण्यास नकार

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी, भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांनी भाजपकडून आगामी पोटनिवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीचा आग्रह असल्याचा प्रस्ताव घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वतः विनवणी करण्यास गेले होते. मात्र, जाधव यांनी हा प्रस्ताव धुडकाविल्याने चंद्रकांत पाटील यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.आमदार जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार उभा करण्यासाठी भाजपची धडपड सुरू झाली आहे.

जयश्री जाधव यांची काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याची चर्चा झाली. त्यामुळे त्या काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढविणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत या मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी जयश्री जाधव यांना गळ घातली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप कोअर कमिटीचाही यासाठी आग्रह असल्याचे सांगितले; पण जाधव यांनी भाजपकडून लढण्यास स्पष्ट नकार दिला.