नाशिक – ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नसेल त्यांनी पुढील आठ दिवसांत लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यांना रेशनवर मिळणारे धान्य बंद केले जाईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.हा निर्णय केवळ नाशिक जिल्ह्यापुरताच नव्हे तर आवश्यकता वाटल्यास राज्यातही हाच निमय लागू केला जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काेरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर निर्बंध लावावेच लागतील, असा इशारादेखील भुजबळ यांनी दिला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपचार असल्याने लस घेण्याचे राहून गेलेल्यांनी तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तर शासकीय कार्यालयांमध्येदेखील ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.