वाढीव बांधकाम नियमित’ मधून महसूल मिळवण्याची कोल्हापूर महापालिकेला संधी

कोल्हापूर : शासकीय योजनेतील वाढीव बांधकामे नियमित करून तिजोरीत भर घालण्याची संधी महापालिकेला चालून आली आहे. खुद्द मिळकतधारक त्याला राजी असल्याने तळेगाव- दाभाडे तसेच म्हाडाच्या योजनेतील घरकुलांचे वाढीव बांधकाम नियमित करून महसूल मिळवता येऊ शकतो.

नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली असून मनुष्यबळ मिळाल्यास महापालिकेला उत्पन्‍न मिळेल. शहराच्या विविध भागात तळेगाव-दाभाडे तसेच म्हाडाच्या माध्यमातून घरकुले उभी राहिली आहे. काळाच्या ओघात खोल्या अपुऱ्या पडत असल्याने अनेकांनी वाढीव बांधकाम केले. ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दंडाची तिप्पट आकारणी करून बांधकामे नियमित करण्यास मिळकतधारकांची तयारी आहे. दोनशे ते पाचशे चौरस फुटाचे घर असल्याने मिळकतधारकांना कर्ज मिळविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम परवानगी आहे, भोगवटा प्रमाणपत्र आहे पण घर लहान आहे. त्याच तुलनेत कर्ज मिळत असल्याने त्यांना ही रक्कम कमी पडत आहे.प्रसंगी वाढीव बांधकामाचा दंड भरतो पण बांधकाम नियमित करा अशी त्यांची मागणी आहे. महापालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. पण विशेष कॅम्प घ्यायचा झाल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याचे नगरचना विभागाने सांगितले.